भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन,महिलांच्या समस्या आणि उपाय
जगभरात भारताची ओळख पंथनिरपेक्ष,धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आणि मानवता जपणारा देश म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे भारताने जगाला दिलेला " वसुधैव कुटुम्बकम् " च्या संदेशातून सर्वांना सामावून घेण्याची व आपलेपणाने वागण्याची वृत्ती दिसून येते.कदाचित ही वृत्ती भारतात असणाऱ्या जातीय,धार्मिक, वांशिक, भाषिक विविधतेतून आलेली असावी.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण 77 व्या वर्षात पदार्पण करत आहोत. पण तरीही भारतासारख्या लोकशाही आणि मानवतावादी मूल्य जपणाऱ्या देशासमोर आज काही सामाजिक , राजकीय ,आर्थिक घटकात स्त्रियांचा विकास साधण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्रस्तुत लेखात आपण स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यां आणि त्यांच्या उपायोजना यावर चर्चा करणार आहोत.
समस्या:-
१) स्त्रियांच्या शैक्षणिक समस्या:-
भारतीय संस्कृतीत स्त्रीला शिकवणे म्हणजे काही अनर्थ ओढवेल किंवा घराचा सर्वनाश होईल. अशी भीती भारतीय समाजात पाहायला मिळते. यातूनच कदाचित स्त्रिशिक्षणाला दुय्यम दर्जा प्राप्त झाला असेल. या सर्वांचा दूरगामी परिणाम म्हणून सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ४८.०४ % ही स्त्रियांची तर पुरुष ५१.९६% की इतकी शैक्षणिक टक्केवारी आपल्याला पहायला मिळते. मात्र ही टक्केवारी विकसित राष्ट्रांच्या मानाने फार कमी असल्याचे भासते. असे म्हटले जाते की , " एक स्त्री शिकली म्हणजे ती कुटुंबाचा उद्धार करते आणि एक कुटुंब शिकले म्हणजे समाजाचा उन्नतीस हातभार लावला जातो. त्याचप्रमाणे एक समाज जर शैक्षणिक दृष्ट्या विकास साधण्यासाठी तत्पर असेल तर ह्यातून जिल्हा, राज्य आणि देशाचा विकास होतो. "
२) सामाजिक समस्या:-
अ) पितृसत्ताक कुटुंब पद्धती किंवा पुरुषांचे नैतिक वर्चस्व आणि स्त्रियांना निर्णय निर्धारण प्रक्रियेतून वगळणे:-
सिमोंस आपल्या द सेकंड सेक्स या पुस्तकात असे म्हणतात की," स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडवली जाते. "
ज्याप्रमाणे स्त्रियांना शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापेक्षा कित्येक पटीने सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते. भारतात असणारी पितृसत्ताक कुटुंब पद्धती आणि त्यातून निर्माण होणारी पुरुष प्रधान संस्कृती आणि ह्या संस्कृतीतून निर्माण होणाऱ्या सत्तेमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा येथे. त्यांना कुटुंबात असणारे दुय्यम स्थान आणि त्यामुळे निर्णय निर्धारण प्रक्रियेत मिळणारे दुय्यम स्थान.त्यामुळे त्यांना आपला विकास साधण्यास अडथळे निर्माण होतात.
ब) जुन्या रुढींचा पगडा आणि स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी:-स्त्रियांनी फक्त घर काम पहावे म्हणजेच त्यांना " रांदा वाडा उष्टी काढा " इथपर्यंत स्त्रियांना सिमीत करून ठेवले आहे.जर एखादी स्त्री शिकलेली असेल तर तिच्या घराचा सर्वनाश होईल किंवा तिचा पतीचा देहवास होईल. असे चुकीचे गैरसमज पसरवून त्यांच्या विकासास खीळ बसवली आहे. त्यांचा विकास म्हणजे घरकाम करणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणे इतपत चाकोरीबद्ध विकासाची व्याख्या केली आहे. स्त्रियांचे स्थान घरापर्यंत मर्यादित झाले आहे. हे आपल्याला पहावयास मिळते.
क) हुंडाबळी:-ज्या पुरुषाला जास्त हुंडा मिळेल तो पुरुष कर्तृत्ववान (कर्तृत्व नसले तरीही)समजले जाते. आपल्या मुलीला आपण जर हुंडा दिला तर सासरी तिचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला जाईल. ह्या भाबड्या आशेवर तिचे वडील भरमसाठ हुंडा देतात. या पद्धतीमुळे अनेक माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार पाहायला मिळतात. पैशाच्या लालसेपोटी स्त्रियांवर मानसिक,शारीरिक आणि त्याच प्रमाणे त्यांचे आर्थिक शोषण केले जाते. यातून अनेक समस्या उद्भव होताना दिसून येत आहेत.हुंडा देण्याच्या पद्धतीचा इतिहास स्पष्ट सांगता येत नाही. भारतीय समाजाला हुंडाबळी ही लागलेली एक कीड आहे असे बरेच विचारवंतांचे म्हणणे आहे.
ड) स्त्रीभ्रूण हत्या:-भारतीय समाजात पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांना प्रथम स्थान दिले जाते आणि स्त्रियांना दुय्यम महत्त्व दिले जाते. घरात जर मुलगी जन्मली तर तिची हत्या केली जाते आणि मुलगा जन्मला तर त्याचे संगोपन केले जाते.
यातून लिंग भावात्मक असमानता प्रकर्षाने निर्माण झालेले दिसून येते.आज भारताचे लिंग गुणोत्तर प्रत्येक १००० पुरुषामागे ९२४ स्त्रिया आहेत. यातून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग) स्त्रियांना मान पण समानता दिली जात नाही:-भारतीय समाजात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात मान दिला जातो. पण समानतेची वागणूक देण्यासाठी पुरुषी मानसिकता असणारी संस्कृती कधीही ही धजावत नाही. स्त्रियांना भारतीय समाजात दैवी किंवा माता,भगिनी असे आदराचे स्थान दिले जाते. पण एक व्यक्ती म्हणून स्त्रीला बघण्याची वृत्ती अगदी कमी प्रमाणात दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत त्यांना समानतेला बराच वेळा मुकावे लागते. त्यातून सामाजिक असमानता नजरेस पडते. त्यामुळे योग्य वागणूक आणि वर्तणूक जर मिळाली तरच हा भेद काय प्रमाणात कमी होऊ शकतो.
३) स्त्रियांचे राजकीय स्थान किंवा राजकीय क्षेत्रात कमी सहभाग:- राजकीय क्षेत्रात जगभराच्या तुलनेत भारतीय स्त्रियांच्या अत्यंत अल्प किंवा नगण्य असा सहभाग पहावयास मिळतो. भारतीय स्त्रिया या फक्त कुटुंब सांभाळू शकतात किंवा त्या राजकारणात सक्षम पणे आपली छाप पाडू शकत नाहीत असा अलिखित नियम बराच वेळा दिसून येतो.काही प्रमाणात स्त्रियांमध्ये राजकीय क्षेत्रात कार्य करण्यास उदासीनता दिसून येते. भारतीय स्त्रियांच्या राजकारणात आमदार किंवा खासदार म्हणून सहभागाच्या टक्का हा फक्त ९% इतका आहे. तर एक मतदार म्हणून राजकीय सहभागाचा टक्का हा ६५.६३% आहे. पण त्यामानाने पुरुषांचा राजकीय मतदान प्रक्रियेत ६७.०९% इतका दिसून येतो.
४) आर्थिक स्थान:-स्त्रियांच्या घरगुती कामाचा आर्थिक व्यवहारात समावेश न केल्याने त्यांच्या क्रयशक्ती ला मूल्य प्राप्त होत नाही. परिणामता त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबाईल नसल्याने त्या अप्रत्यक्षरीत्या आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीवर किंवा पतीवर अवलंबून असतात. यातून त्यांच्या जीवनात आर्थिक अस्थिरता निर्माण होते आणि इतरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती बळावते. या सर्वांचा परिणाम आर्थिक घटक बरोबर होतो. त्याचप्रमाणे भारताचा जीडीपी वरही होतो. त्यामुळे भारताच्या आर्थिक घडी कोलमडण्याची शक्यता निर्माण होते.
५) कायद्याचे दुर्बल करणे आणि स्त्रियांचे कायद्याविषयी अभिन्नता:- शिक्षणाच्या कमतरतेमुळे किंवा आपल्या स्वतःच्या हक्काचा विषय उदासीन पणामुळे स्त्रिया स्वतःच्या हक्क आणि अधिकार याविषयी अभिन्नता दिसून येते. यात प्रमुख दुसरे कारण म्हणजे स्त्रियांविषयी कायदे निर्माण करण्यात आले त्याची चोखपणे अंमलबजावणी न करणे. यातून निर्माण झालेली उदासीनता हे एक महत्त्वाचे कारण सांगता येईल.
या सर्व समस्यांवर चर्चा झाल्यानंतर त्यावर काही उपायोजना चा आढावा घेणे क्रमप्राप्त आणि महत्वाचे वाटू लागते. जेणेकरून स्त्रियांच्या समस्येबाबत असणाऱ्या उपायांचा वापर करून त्यांच्या या प्रश्नांची सोडवणूक करता येईल.
आपल्याला उपाय पुढील प्रमाणे सांगता येतील.
१) शिक्षणाचा पुरस्कार करणे त्यातून समाज प्रबोधन घडवून आणणे जेणेकरून लोकांमध्ये स्त्रियां च्या प्रश्नाविषयी जाणीव निर्माण होईल.
२) स्त्रियांना सन्मान हा बरोबर समानतेची वागणूक देणे.
३) निर्णय निर्धारण प्रक्रिया स्त्रियांना सामान घेणे.
४) स्त्रियांना स्त्रियांच्या विकासासाठी बाधक असणाऱ्या रूढी-परंपरांना मूठमाती देणे आणि स्त्रियांच्या विकासासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असणे.
५)स्त्रियांचे राजकारणामध्ये सहभागाचे प्रमाण वाढवण्यासाठी पक्षांतर्गत आणि संसदेमध्ये काही जागा राखीव ठेवणे जेणेकरून त्यांना त्यांच्या समस्या मांडता येतील.
६) स्त्रियांमध्ये स्वतःच्या हक्क आणि अधिकारा विषयी जाणीव जागृती निर्माण करणे.
७) स्त्रियांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महिला आयोगाला अर्धन्यायिक दर्जा देणे आणि कौटुंबिक न्यायालयाचे अधिकार देऊन त्याला बळकटी देणे.
७) स्त्रियांसाठी निर्माण करण्यात आलेल्या विशेष विवाह कायदा १९५४ हुंडा निषिद्ध कायदा १९६२, भारतीय घटस्फोट कायदा कार्य स्थळावरील महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा २०१३ अशा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे.
स्वतंत्र भारताच्या एक नागरिक म्हणून स्त्रियांना सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेची वागणूक देणे आणि त्यातून स्त्रियांचा उन्नती होण्यासाठी समानतेची त्याच बरोबर एक व्यक्ती म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोन विकसित करणे. ही देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून आवश्यक असेल.
Comments
Post a Comment